Friday, 12 August 2016

शेवरकंद कोकणासाठी

शेवरकंदाचे इंग्रजी नाव कसावा. त्यालाच जगाच्या अन्य काही भागात टॅपिओका, मॅनिऑक, युका अश्या नावांनीही ओळखले जाते व हि नावेही इंग्रजीत प्रचलित आहेत. तसे हे पीक मुळचे कोकणातले नाही. ह्याची पाने शेवर किंवा सावर ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वृक्षासारखी असतात व ही वनस्पती वैज्ञानिक वर्गीकरणानुसार शेवराच्या कुळातीलच आहे. हे सर्व पाहता त्याचे शेवरकंद हे स्थानिक नाव एकदम योग्यच म्हणायला हवे.

उष्ण व दमट हवामानामध्ये वाढणारे हे पीक जगाच्या बऱ्याच भागांमध्ये एक महत्वाचे खाद्यपीक बनले आहे. स्टार्चच्या उत्पादनासाठी शेवरकंदाचा बराच उपयोग केला जातो व त्यामुळे त्याला औद्योगिक महत्वही आले आहे. चीनमध्ये शेवरकंदापासून इथेनॉलही बनवण्यात येते. भारतात केरळ, तामिळनाडू व आंध्र प्रदेश ह्या राज्यांमध्ये त्याची व्यावसायिक तत्वावर शेती केली जाते. महाराष्ट्रात उपासाला मोठ्या प्रमाणावर खाल्ला जाणारा साबुदाणा ह्याच कंदापासून तयार केला जातो.

कोकणातील जमीन व हवामान ह्या पीकाला अतिशय मानवणारे असले तरी ह्याची शेती मात्र दिसत नाही. त्याची दोन कारणे असू शकतात एक म्हणजे ह्या कंदांचा वापर स्थानिक पारंपरीक खाद्यसंस्कृतीमध्ये नसणे तसेच त्यावर आधारीत प्रक्रीया उद्योगांची जवळपास अनुपलब्धता असणे.

ह्या दोन बाबी सध्या अनुकुल नसल्या तरी शेवरकंदाची शेती कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर करता येऊ शकते ह्याबद्दल विश्वास मात्र वाटतो. कोकणातील साधारण असलेल्या पाण्याचा निचरा सहज होऊ शकणाऱ्या हलक्या जमीनी शेवरकंदाच्या लागवडीसाठी योग्य आहेत. क्लस्टर पध्दतीने म्हणजे एका छोट्या भौगोलिक क्षेत्रात अनेक शेतकऱ्यांनी ह्याची शेती केल्यास प्रक्रीया उद्योगाला आवश्यक अश्या प्रमाणात त्याचे उत्पादन घेता येऊ शकेल. भारतामध्ये शेवरकंदांची उत्पादकताही जास्त म्हणजे एक गुंठ्याला ३०० किलोपर्यंत आहे. तसेच ही वनस्पती बहुवर्षायु आहे त्यामुळे लागवडीनंतर सहा ते दहा महिन्यांपर्यंत पीकाची काढणी केली तरी चालते. गुरे व वानर ह्या पिकाचे फारसे नुकसान करत नाहीत. असे बरेचसे मुद्दे शेवरकंदाची शेती कोकणात करण्यास अनुकूल आहेत.

शेवरकंदामध्ये बटाट्यासारखेच कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणावर असतात व तंतूंचे प्रमाण कमी असते. त्याचे दोन दोष म्हणजे त्याच्या सालीमध्ये ग्लुकोसाईड्स नावाचा मानवी शरीराला अपायकारक पदार्थ असतो आणि कंदांची काढणी केल्यावर त्यांची साठवणक्षमता केवळ २-३ दिवसांचीच असते. हे दोष लक्षात घेऊन त्याची योग्य प्रक्रीया करणे आवश्यक असते. कंदाची साल पूर्णतः काढून टाकून उर्वरित भागामध्ये असलेले द्रव अवशेष पिळून काढले की हे ग्लुकोसाईड्स बरेचसे काढून टाकता येतात. तसेच कंदाचे तुकडे १० मिनीटे उकळत्या पाण्यातून काढून वापरता येतात. शिजवलेल्या कंदाची भाजी, तळलेले किंवा बेक्ड फिंगर चिप्स करता येतात. शेवरकंदाचा कीस करून बटाट्याचा किंवा रताळ्याचा किस ज्यापध्दतीने परतून वाफवून करतात तसाच करता येतो. हा कीस वाळवून ठेवता येतो किंवा वाळवलेल्या कीसाचे पीठ करूनही वापरता येते. दक्षिण अमेरीकेत कंदाच्या पावडरीपासून बरेच दिवस टिकेल अशी एक प्रकारची सुकी कडक भाकरीही बनवली जाते.

शेवरकंदाची लागवड करायची असल्यास त्याच्या फांद्यांच्या तुकड्यापासून करता येते. ह्याच्या लागवडीसाठी लागणारे बेणे कोकण कृषि विद्यापीठ, दापोली तसेच मातृमंदीर, देवरूख या दोन संस्थांमधून उपलब्ध होऊ शकेल. कोकणातील काही शेतकऱ्यांच्या परसबागेमध्ये तसेच कुंपणालाही ह्याची लागवड आढळते. त्यांच्याकडूनही थोड्याप्रमाणात बेणे मिळवता येईल. 

- सचिन पटवर्धन, गोळप, रत्नागिरी

No comments:

Post a Comment