Monday, 14 September 2015

भोपळ्याची फुले


लाल भोपळा हे पीक कोकणातील परसबागेत पावसाळ्यात हमखास सर्रास दिसून येते. भोपळ्याच्या फळांचा उपयोग सर्वज्ञात आहेच परंतु त्याच्या वेलांना लागणाऱ्या कोवळ्या पानांचा व फुलांचाही आहारात उपयोग करता येतो. भोपळ्याच्या वेलाला नर व मादी अशी दोन प्रकारची फुले येतात. मादी फुलांना फळे धरतात तर त्यांच्या फलनासाठी लागणारे परागकण नर फुलांमध्ये असतात. ह्या नर फुलांचा वापर करून काही पदार्थ पारंपरिक रीत्या कोकणात तयार केले जातात.
ही फुले नाजुक असतात आणि त्यांना फार जास्त शिजवून चालत नाहीत. ह्या फुलांमध्ये एक प्रकारचा गोडवा असतो.
आमच्याकडेही असेच काही वेल आम्ही लावले आहेत आणि त्याला सध्या फुले धरायला सुरुवात झाली आहे. आमच्या एका नातेवाइकांकडे त्यापासून केलेले भरीत खाल्ले होते. ते आम्ही आमच्याकडे करून बघितले आणि चांगले जमलेही. ह्या भरताची कृती आणि फोटो येथे देत आहे. संपूर्ण कृतीचे श्रेय माझी बायको तेजस्विनी हिचे. मी फक्त तिच्यामागे लागून हा पदार्थ करुन घेतला, त्याचे फोटो काढले आणि हे ब्लॉग पोस्ट लिहून काढले.
भोपळ्याच्या फुलांचे भरीत
साहित्य:
भोपळ्याची नर फुले- 8
मिरच्या- 2 लहान
जीरे- एक छोटा चमचा
तूप- दोन चमचे (तूप नसल्यास तेलही चालेल)
मीठ- एक छोटा चमचा किंवा आपल्या चवीनुसार
साखर- एक चमचा
दही- दीड वाटी
कृती:

1. फुले हलक्या हाताने स्वच्छ करावीत. बऱ्याच वेळा त्यात मुंग्या व कीडे असतात. त्यांचे आतील केसर काढून टाकावेत. फुलांच्या दांडीचा व हिरवा पाकळ्यांचा भाग काढू नये. तसाच ठेवावा.
2. फुले चिरुन घ्यावीत. फार बारीक चिरू नये.
3. कढईमध्ये तूप घालून तापवावे व जीरे घालावे. जीरे तडतडल्यावर त्यामध्ये दोन मिरच्या उभ्या चिरुन टाकाव्या व त्यानंतर चिरलेली फुले घालावी. फक्त एक मिनिट परतावी. जास्त वेळ परतू नये.

4. थंड झाल्यावर दही, साखर व मीठ घालावे. भोपळ्याच्या फुलांचे भरीत तयार!